Ad will apear here
Next
वक्तृत्वकला जोपासण्यासाठी उत्तम मार्गदर्शक
‘वक्ता दशसहस्रेषु’ म्हणजे उत्तम भाषण करणारा दहा हजारांत एकच निर्माण होतो असे म्हटले जाते. अशी ही वक्तृत्व म्हणजेच भाषणाची कला हे अत्यंत प्रभावी साधन आहे. ही कला कशी साध्य करावी, याची सखोल माहिती हवी असेल, तर संदीप मगदूम यांचे ‘वक्तृत्वधारा’ हे पुस्तक वाचायला पर्याय नाही. या पुस्तकाचा हा परिचय...
...........
शाळेत असताना महात्मा गांधी जयंती, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, नेहरू जयंती यांसारख्या विशेष दिनांचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना भाषण करण्यास सांगितले जाते. अनेकदा भाषण करणारा मुलगा किंवा मुलगी समोरचा समूह बघून घाबरून जात असे आणि त्याची भंबेरी उडत असे. पाठ केलेले आठवत नसल्याने अनेकदा तारांबळ उडत असे. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात असे अनुभव घेतले असतील. अनेकांचा अनुभव उलटाही असेल. फर्डे वक्तृत्व असलेल्या वक्त्याचे भाषण ऐकून अनेकांच्या विचारात बदल होत असल्याचेही आपण अनुभवतो. प्रा. शिवाजीराव भोसले, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या अमोघ वाणीने महाराष्ट्राला वेड लावल्याचे आपल्याला माहीत आहेच. ‘वक्ता दशसहस्रेषु’ म्हणजे उत्तम भाषण करणारा दहा हजारांत एक निर्माण होतो असे म्हटले जाते. अशी ही वक्तृत्व म्हणजेच भाषणाची कला म्हणजे अत्यंत प्रभावी साधन आहे. ही कला कशी साध्य करावी, याची सखोल माहिती हवी असेल, तर संदीप मगदूम यांचे ‘वक्तृत्वधारा’ हे पुस्तक वाचायलाच हवे.

शब्दासारखे अस्त्र नाही. त्यामुळे ते जपून वापरावेत, असे म्हटले जाते. शब्दांची ही ताकद अनेक बदल घडवू शकते. शब्दांचा आधार घेत अमोघ वाणीच्या अनेक वक्त्यांनी समाजात क्रांती घडवली आहे. उत्तम वक्ता समाजाला सकारात्मक कामासाठी उद्युक्त करू शकतो. वक्तृत्वाची ही कला आत्मसात करणे अगदी सहज सोपेही नाही. त्यासाठी अभ्यास करावा लागतो. ही वक्तृत्वकला आत्मसात करण्याची ज्यांची इच्छा आहे, त्यांना मदत व्हावी, या उद्देशाने लेखक संदीप मगदूम यांनी ‘वक्तृत्वधारा’ या पुस्तकातून उत्तम मार्गदर्शन केले आहे. भाषण कसे करावे, त्यासाठी काय तयारी करावी, हे सांगण्याबरोबरच उत्तम भाषणाचे नमुनेही त्यांनी दिले आहेत. 

कोल्हापूर येथील संदीप मगदूम यांनी स्वतः ३००पेक्षा अधिक वक्तृत्व स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवली. या कलेनेच त्यांना प्रबळ आत्मविश्वासाची देणगी दिली. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन, वक्तृत्व स्पर्धांचे परीक्षण, व्याख्यानांमधून वक्तृत्वकलेबाबत मार्गदर्शन असा विविधांगी अनुभव त्यांना आहे. त्यांच्या वैविध्यपूर्ण अनुभवांतून हे पुस्तक साकारले असल्यामुळे तंत्रशुद्ध आणि अभ्यासपूर्ण असल्याचे वेळोवेळी जाणवते. आत्मविश्वास नसणारा विद्यार्थीदेखील हे पुस्तक वाचून भाषण करण्यासाठी नक्कीच प्रेरित होऊ शकतो. केवळ मराठी भाषेतीलच नव्हे, तर इंग्रजी भाषेतीलही काही भाषणेही यात आहेत. त्यामुळे इंग्रजीतून भाषण कसे करावे याचे धडेही मिळतात. भाषण तयार करताना आणि सादर करताना कोणत्या चुका टाळाव्यात, कोणती काळजी घ्यावी याचेही मगदूम यांनी बारकाईने मार्गदर्शन केले आहे. विद्यार्थी, शिक्षक, पालक, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, व्यावसायिक सर्वांसाठीच हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे.

भाषणाची संहिता हा भाषणाचा आत्मा असतो, त्यामुळे भाषण तयार करताना केवळ अलंकारिक भाषेचा, काव्यपंक्तींचा वापर केला, तरच ते चांगले होते असे नाही, त्यातील विचारदेखील सकस असावे लागतात, हा संदेशही मगदूम यांनी प्रभावीपणे दिला आहे. या पुस्तकात त्यांनी राष्ट्रीय नेते, विविध दिन, सामाजिक विषय अशा विविध प्रकारच्या विषयांवरील भाषणांचे उत्तम नमुने दिले आहेत. अर्थातच ही भाषणे म्हणजे तयार संहिता नाहीत; पण एखादे भाषण तयार करताना संदर्भ साहित्य म्हणूनही त्याचा उपयोग होऊ शकतो. 

या पुस्तकाची प्रस्तावना ज्येष्ठ लेखक, सामाजिक कार्यकर्ते सुनीलकुमार लवाटे यांनी लिहिली आहे. वक्तृत्व ही वाचिक कला आहे. इसवी सन पूर्व पाचव्या शतकात ग्रीकमध्ये जन्म झालेल्या या वक्तृत्वकलेचा अल्पावधीतच जगभर प्रसार झाला. त्या काळात आदिवासींची जमीन लुबाडणाऱ्या धनाढ्यांविरुद्ध बिनतोड बाजू मांडणाऱ्याची, युक्तिवाद करणाऱ्यांची गरज निर्माण झाली. अशा बिनतोड युक्तिवाद करणाऱ्या लोकांनी या कलेचा पाया घातला. त्यांनी केलेले युक्तिवाद या वक्तृत्वकलेचे आद्य नमुने होते. सिसिलियन ग्रीक कोरॅक हा आद्य वक्ता म्हणून ओळखला जातो. शंकराचार्य, कुमारीलभट्ट, मंडनमिश्र हे भारतातील आद्य वक्ते. महाराष्ट्रात विसाव्या शतकाच्या प्रारंभी ज्या सामाजिक सुधारणा घडून आल्या, त्यात तत्कालीन वक्त्यांचे योगदान मोठे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण यांचे नेतृत्व बहरले ते प्रभावी वक्तृत्वामुळे. बदलत्या काळात वक्तृत्वकलेची व्याप्ती वाढली आहे. सूत्रसंचालन, कार्यक्रम संयोजन आदी क्षेत्रांतही वक्तृत्व चांगले असणे आवश्यक आहे. त्यासाठी वाचन, भाषेवर प्रभुत्व या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्या सर्वांचा समावेश असलेले उत्तमोत्तम भाषणाचे नमुने मगदूम यांनी या पुस्तकात दिले आहेत. ते अत्यंत कौतुकास्पद असल्याचे लवाटे यांनी म्हटले आहे. 

उत्तम वक्ता व्हायचे असेल तर हे पुस्तक एक उत्तम मार्गदर्शक ठरू शकते, यात शंका नाही. 

पुस्तक : वक्तृत्वधारा
लेखक : संदीप मगदूम
प्रकाशक : वेदांतराजे प्रकाशन, कोल्हापूर
पृष्ठे : १८४
किंमत : १४० रुपये 

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा. या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याची बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZTYBK
Similar Posts
‘वक्तृत्व कलेसाठी ‘वक्तृत्वधारा’ मार्गदर्शक’ सिंधुदुर्गनगरी (ओरोस) : ‘दर्जेदार शिक्षणासाठी शिक्षकांनीही लिहिते झाले पाहिजे. ‘वक्तृत्वधारा’ हे पुस्तक एका शिक्षकाकडून लिहिले हे आनंददायी आहे. वक्तृत्व कलेसाठी संदीप मगदूम लिखित हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल’, असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले.
कोकणी, मालवणी आणि गोमंतकीय भाषेची ‘अमृतवाणी’ म्हणींचे भाषेमधील स्थान, त्यांची उत्पत्ती विशेषतः मालवणी, कोकणी आणि गोमंतकीय भाषेतील म्हणी, त्यांचे सामाजिक, सांस्कृतिक अंगाने विश्लेषण डॉ. विद्या प्रभुदेसाई यांनी ‘अमृतवाणी’ या आपल्या पुस्तकात केले आहे. त्या पुस्तकाचा हा परिचय...
कर्दळीवन एक अनुभूती... कर्दळीवन या स्थानाला दत्त संप्रदायात महत्वाचे स्थान आहे. कर्दळीवन हे दत्तगुरुंचे गुप्त स्थान आणी श्रीस्वामी समर्थांचे प्रकटस्थान आहे. अन्य अनेक पौराणिक, धार्मिक, आध्यात्मिक, ऐतिहासिक संदर्भ या स्थानाला आहेत. या ठिकाणाला भेट दिल्यावर एक वेगळी, दिव्य अनुभूती होते, असे दत्तभक्त सांगतात. दुर्गम, सोयीसुविधांचा
नियतीचे प्रतिबिंब हातावरच्या रेषा, उंचवटे, बांधणी, स्पर्श, रंग, हाताचा आकार, तळहातावर असणाऱ्या विविध आकृत्या (फुल्या, चांदणी, साखळी, मत्स्य, डाग), बोटांची कमी-जास्त लांबी, एकमेकींना छेडणाऱ्या रेषा, रेषांचे वळसे या सर्वांचा आपल्या शरीर प्रकृतीशी, प्रारब्धाशी असणारा संबंध यातून प्रत्येक केस कशी हाताळली आणि हस्तरेषांचा अभ्यास

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language